California fire: नुकसान यूपी-बिहारच्या बजेटपेक्षा अधिक, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिस जंगलातून सुरू झालेल्या आगीने लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले. मंगळवारपासून अर्थात गेल्या 6 दिवसांपासून आग भडकतच असून आतापर्यंत 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. महासत्ता असलेल्या देशाला चटके देणारी आग अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक आणि महागडी आहे. आगीमुळे सुमारे 11 ते 13 लाख कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. एकूणच हिंदुस्थानातील उत्तर प्रदेश (3 लाख कोटी), बिहार (3 लाख कोटी), मध्य प्रदेश (3 लाख कोटींपेक्षा जास्त) आणि दिल्ली (76 हजार कोटी) या चार राज्यांच्या बजेटपेक्षा अधिक नुकसान या आगीने केले आहे.

जंगली भागातून सुरू झालेल्या आगीने निवासी भागात प्रवेश करून एकच हाहाकार माजवला. तब्बल 40,000 एकर जमीन आगीने लालबुंद झाली आहे. 12 हजारांहून अधिक घरांचे अस्तित्वच संपले आहे.

आग आणखी भडकणार

पुढील काही दिवसांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या विनाशाला युद्धाची उपमा दिली. श्वसनाशी संबंधित समस्या असलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. कॅनडा आणि मेक्सिकोनेदेखील कॅलिफोर्नियातील बचाव कार्यात सहभाग घेतला आहे.

सर्व उपाययोजना कुचकामी

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. शेकडो हेलिकॉप्टर तैनात आहेत. तरीदेखील आगीवर नियंत्रण मिळवताना नाकी नऊ येत आहे. दीड लाखांहून अधिक लोकांची सुटका करण्यात आली आहे. अनेक तज्ञांनी आगीच्या या घटनेसाठी हवामान बदलाला जबाबदार धरले. कारण येथे दशकापासून दुष्काळाची परिस्थिती आहे. मागील वर्षी या परिसरात खूप उष्णता होती. त्यात त्यानंतर पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. हिवाळ्य़ातही पावसाने दडी मारली. सुकलेली झाडे आगीला प्रोत्साहन देत असून वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे आगीने झपाटय़ाने शहराकडे कूच केले.