कॅलिपहर्नियातील लॉस एन्जेलिस येथे हाहाकार माजवत असलेल्या आगीला उद्या, मंगळवारी एक आठवडा पूर्ण होईल. आतापर्यंत या आगीत 24 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 16 हून अधिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. हवामान विभागाने बुधवारपर्यंत भीषण आगीच्या परिस्थितीमुळे धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, वारे ताशी 80 किमी वेगाने आणि पर्वतांमध्ये ताशी 113 किमी वेगाने वाहणार असल्याने उद्या, मंगळवारचा दिवस अत्यंत धोकादायक असेल. ‘सांता आना’ वाऱयाच्या प्रभावामुळे हवामानाची परिस्थिती अद्यापही गंभीर आहे, असे हवामान शास्त्रज्ञ रिच थॉम्पसन यांनी सांगितले.
‘लॉस एन्जेलिस काऊंटीमधील सुमारे 1,50,000 लोकांना बाहेर काढण्याचा आदेश आहे. 700 हून अधिक रहिवाशांनी नऊ वेगवेगळय़ा ठिकाणी आश्रय घेतला’, असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नऊ राज्यांतील यंत्रणा काम करत असून, 1,354 अग्निशमन दलाच्या गाडय़ा, 85 विमाने आणि 14,000 हून अधिक कर्मचारी जोखीम पत्करून आगीचा सामना करत आहेत.
ऑस्ट्रेलियन अभिनेत्याचा मृत्यू
कॅलिपहर्नियातील आगीत ऑस्ट्रेलियन टीव्ही अभिनेता रॉरी सायक्सचाही मृत्यू झाला. आतापर्यंत पॅरिस हिल्टन, टॉम हँक्स, स्टीव्हन स्पीलबर्ग यांसारख्या हॉलीवूड कलाकारांची घरे आगीमुळे नष्ट झाली. ईटन आणि पॅलिसेड्समधील अनेक लोक बेपत्ता आहेत. रविवारी रात्रीपासून वाऱयाचा वेग मंदावल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात काहीशी मदत झाली.