‘मला स्लीप ऍप्निया’, झोपेतच श्वास बंद होतो! बायसॅप मशीन आणि मदतनीस द्या; वाल्मीक कराडची न्यायालयाकडे मागणी

अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडने आपल्याला ‘स्लीप ऑप्निया’ नावाचा दुर्धर रोग असून झोपेतच आपला श्वास बंद होतो. त्यामुळे बायसॅप मशीन आणि एक मदतनीस देण्यात यावा, अशी वाल्मीक कराडने केलेली मागणी केज न्यायालयाने फेटाळली आहे.

खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडने केज न्यायालयात विनंती अर्ज करून आपल्याला ‘स्लीप ऑप्निया’ नावाचा दुर्धर आजार असून त्यासाठी बायसॅप मशीन आणि 24 तासांसाठी एक मदतनीस देण्याची मागणी केली. बायसॅप मशीनशिवाय आपण झोपू शकत नाही, असेही त्याने अर्जात म्हटले होते. मात्र केज न्यायालयाच्या न्या. ए.व्ही. पावसकर यांनी वाल्मीक कराडचा हा विनंती अर्ज फेटाळला.

मला खिचडी पाहिजे…

खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले असून तेथेच सीआयडीचे पथक त्याची चौकशी करत आहे. आलिशान, राजेशाही जीवन जगणारा वाल्मीक कराड कोठडीत आल्यापासून प्रचंड अस्वस्थ आहे. दोन दिवसांपासून तो झोपलेलाही नाही. वाल्मीक कराडला गुटख्याचे व्यसन असून कोठडीत त्याला गुटखा मिळत नाही. त्यामुळेही तो बेचैन असून कोठडीत सतत येरझारा घालत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दोन दिवसांपासून वाल्मीक कराडने व्यवस्थित जेवणही घेतलेले नाही. दोन दिवसांपासून तो खिचडी मागतो आहे.

काय आहे स्लीप ऑप्निया आजार

ज्यांचे वजन जास्त आहे, तसेच लठ्ठ व्यक्तींमध्ये आढळणारा हा दुर्मिळ आजार आहे. झोपल्यानंतर या व्यक्तीची जीभ मागे पडते. जीभ मागे पडल्यानंतर श्वास कोंडला जातो. जीभ मागे पडून श्वास रोखला जाऊ नये यासाठी बायसॅप मशीन लावली जाते.