राष्ट्रीय महामार्गावर मंजूर 109 पैकी केवळ 73 ट्रॉमा सेंटर सुरू, अपघात झाल्यास तत्काळ उपचार कठीण; कॅगच्या अहवालातून उघड

भीषण रस्ते अपघातातील मृत्यू टाळण्यासाठी हिंदुस्थान सरकारने अकराव्या पंचवार्षिक योजनेपासून राज्यात राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय रुग्णालयांमध्ये ट्रॉमा केअर सेंटर्सच्या विकासासाठी योजना लागू केली. या योजनेअंतर्गत राज्य शासनाने 109 ट्रॉमा केअर सेंटर्ससाठी मंजुरी दिली, परंतु त्यापैकी केवळ 73 ट्रॉमा सेंटर्स उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती कॅगने सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनाच्या केलेल्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आली आहे.

महामार्गावरील शासकीय रुग्णालयांमध्ये ट्रॉमा केअर सेंटर्सच्या विकासासाठी श्रमतावर्धन योजना लागू केली. या योजनेअंतर्गत हिंदुस्थान सरकार राज्यात ट्रॉमा केअर सेंटर्सची स्थापना, मनुष्यबळ तैनात करणे आणि उपकरणांच्या खरेदीसाठी राज्य शासनाला आर्थिक सहाय्य करत होते.

441 आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण नाही

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने डिसेंबर 2022 पर्यंत उभारलेल्या 14, 227 आरोग्य आणि कल्याण केंद्रांपैकी शासनाने 11 हजार 286 आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, मात्र जून 2023 मध्ये 11,286 आरोग्य आणि कल्याण केंद्रांपैकी राज्य शासनाने 10,875 आरोग्य आणि कल्याण केंद्रांचे अद्ययावतीकरण केले. त्यामुळे 441 केंद्रांचे अद्याप अद्ययावतीकरण करण्यात आले नसल्याची माहिती ‘कॅग’च्या अहवालातून उघड झाली.

उभारणीत किती प्रगती?

बांधकामास मंजुरी दिलेल्या 109 ट्रॉमा केअर सेंटर्सपैकी बृहत् आराखडय़ामध्ये मंजुरी दिलेल्या 42 ट्रॉमा सेंटर्ससहीत सप्टेंबर 2021 पर्यंत 73 सेंटर्स बांधण्यात आली. उर्वरित 36 सेंटर्सपैकी 10 ट्रॉमा सेंटर्सची बांधकामे सुरू होती, तर 26 सेंटर्सपैकी सहा ट्रॉमा केअर सेंटर्ससाठी जागाच उपलब्ध न होणे, नऊ सेंटर्सना प्रशासकीय मंजुरी मिळणे, दोन सेंटर्सना निधी उपलब्ध न होणे तर नऊ सेंटर्ससाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार नसणे इत्यादी कारणांमुळे दिरंगाई झाल्याचे समोर आले आहे.