आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा! राज्यात तज्ञ डॉक्टरांची कमतरता, स्त्री रोग विभाग वाऱ्यावर; कॅगच्या अहवालातून उघड

राज्याचा आरोग्य विभाग आधीच व्हेंटीलेटरवर असताना आता विविध रुग्णालयांत तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती कॅगने सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनाच्या केलेल्या लेखापरीक्षण अहवालातून समोर आली आहे. स्त्री रोग विभागात तज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्याने महिलांना आजाराचे निदान करताना तसेच आजारावर उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आरोग्य सेवा, मुंबईचे संचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक विभागाच्या अधिकार क्षेत्रात तज्ञ डॉक्टरांची कमतरता होती. मार्च 2023पर्यंत तज्ञ डॉक्टरांच्या विविध संवर्गात मोठय़ा संख्येने रिक्त पदे होती. मंजूर पदांच्या तुलनेत भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ञ डॉक्टरांच्या आवश्यकतेची तुलना केल्यास कान, नाक, घसा क्ष-किरण तज्ञ, शल्यचिकित्क आणि फिजीशियन संवर्गात मंजूर पदाच्या तुलनेत अनुक्रमे 52 टक्के, 10 टक्के आणि 66 टक्के पदे रिक्त होती.

छाती, क्षयरोग, त्वचा रोग तज्ञांचीही वानवा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकार क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांच्या विविध संवर्गातील एकूण 42 टक्के पदे रिक्त होती. मानसोपचार तज्ञ, छाती आणि क्षयरोग, त्वचा रोग तज्ञ आणि शल्यचिकित्सक या संवर्गातील रिक्त पदे 50 टक्क्यांहून अधिक होती. कान, नाक, घसा तज्ञ यासाठी 58 पदे मंजूर होती. त्यापैकी 40 तज्ञ डॉक्टर कार्यरत असून 18 पदे रिक्त आहेत. शल्यचिकित्सक पदासाठी 171 पदे मंजूर होती. त्यापैकी 80 तज्ञ डॉक्टर कार्यरत असून एकूण 91 पदे रिक्त आहेत.

19 स्त्राr रुग्णालयांमध्ये गंभीर स्थिती 

n महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत 19 स्त्राr रोग रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने पदे रिक्त आहेत. या रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळाचीही गरज आहे. तज्ञ डॉक्टरांची मंजूर पदे 291 आहेत. त्या तुलनेत 224 डॉक्टर कार्यरत आहेत, तर 67 पदे रिक्त आहेत. म्हणेच मंजूर संख्याबळाच्या तुलनेत 23 टक्के डॉक्टरांची कमतरता आहे.

n 1 हजार 11 मंजूर परिचर्या कर्मचाऱ्यांच्या पदांच्या तुलनेत 822 कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच एकूण 189 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

n निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मंजूर 270 पदांच्या तुलनेत 228 कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजेच 42 कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.