अखेर गंगेत घोडं न्हालं, नागपुरात आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मलईदार खात्यांवरून भाजप, शिंदे आणि अजित पवार गटात सुरू असलेल्या खेचाखेचीमुळे लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं अखेर गंगेत न्हालं. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील राजभवनात रविवार, 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिंदे सरकारमध्ये अकार्यक्षम ठरलेल्या आणि वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्लीतील भाजप हायकमांडने दिल्या आहेत. तसेच गृहमंत्रालय, नगरविकास, महसूल, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य यांसारखी महत्त्वाची खाती मिळणार नसल्याचेही बजावले होते. यामुळे खातेवाटपावरून प्रामुख्याने भाजप-शिंदे गटात धुसफूस सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डोळे वटारताच गृहमंत्रालयासह अन्य काही खात्यांसाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे मिळतील ती खाती घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये काम करण्यास तयार झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा अखेर सुटला आहे.

भाजपकडून गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशीष शेलार, पंकजा मुंडे, संजय कुटे, गणेश नाईक, अतुल सावे, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंहराजे भोसले, माधुरी मिसाळ, नितेश राणे, राहुल कुल, गोपीचंद पडळकर यांच्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.

शिंदे गटाकडून उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, आशीष जयस्वाल, योगेश कदम, राजेंद्र यड्रावकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांच्याबरोबर नरहरी झिरवाळ, सना मलिक, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

चंद्रकांतदादा, मुनगंटीवार, सत्तार, केसरकर, तानाजी सावंत, मुश्रीफ, वळसे यांना डच्चू

शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी असणाऱ्या अकार्यक्षम व वादग्रस्त मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात डच्चू देण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार, अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड यांच्यासह डझनभर नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

गृह, अर्थ फडणवीसांकडे?

फडणवीसांकडेच गृहखात्यासह अर्थखात्याचाही कारभार असेल तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, आरोग्य, अजितदादांकडे सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण सोपवण्याची शक्यता आहे.