33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री; फडणवीसांचे धक्कातंत्र! बावनकुळे, गणेश नाईक, पंकजा मुंडे, आशीष शेलार यांचे कमबॅक

नाराजी-धुसफुस, लॉबिंग, भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे उंबरठे झिजवल्यानंतर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर मार्गी लागला. मागील मंत्रिमंडळातील छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर अशा जुन्या बारा खोडांना डच्चू देण्यात आला आहे. आज एकूण 33 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल 23 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आज राजभवनावर पार पडलेल्या सोहळय़ात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 39 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.  मंत्रिमंडळात पंकजा मुंडे, आदिती तटकरे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर या चार महिलांना संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात  भाजप 20, शिवसेना 12 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 सदस्यांना स्थान मिळाले आहे.

एक मंत्रिपद रिक्त

विधानसभेतील 288 सदस्यांच्या सभागृहात 15 टक्के  सदस्य म्हणजे 43 आमदार मंत्री होऊ शकतात. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. आज 33 कॅबिनेट व सहा राज्यमंत्री अशा एकूण 42 सदस्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजून एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे.

33 वर्षांनी नागपूरमध्ये शपथविधी

नागपूरमध्ये 21 डिसेंबर 1991 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार व शपथविधी झाला होता.  तेव्हा छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती, पण यावेळेस त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली आहे.

प्रादेशिक संतुलन

दरम्यान महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक व जातीय संतुलनावर भर दिल्याचे दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून काही नवीन चेहऱयांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

या मंत्र्यांना डच्चू

सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, विजयकुमार गावीत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल भाईदास पाटील, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे.

शपथविधीचे ढिसाळ नियोजन, बॅरिकेड्स ढकलून गर्दी राजभवनात घुसली, भावी मंत्री धक्के खात स्टेजवर

नागपूरच्या राजभवनात आज आयोजित शपथविधीदरम्यान नियोजनातील ढिसाळपणा दिसून आला. शपथविधीसाठी राजभवनाच्या आवारात स्टेज उभारण्यात आला होता. प्रवेशासाठी विशेष पास देण्यात आले होते. तरीसुद्धा मोठी गर्दी झाली. राजभवनात प्रवेश मिळावा म्हणून या गर्दीने बॅरिकेड्सही ढकलून दिले. गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. मेटल डिटेक्टरही ढकलून देत गर्दी आत घुसली.

शपथविधीला पोहोचण्यास उशीर झालेल्या माजी मंत्र्यांना या गर्दीतूनच कसाबसा मार्ग काढत स्टेज गाठावा लागला. गिरीश महाजन आणि राजकुमार बडोले यांना गर्दीतून मार्ग काढत पोलिसांनी स्टेजपर्यंत पोहोचवले. भावी मंत्र्यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून आले होते. त्यांना रोखणा ऱ्या पोलिसांबरोबरही त्यांनी हुज्जत घातली.

भुजबळ समर्थक आक्रमक

छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर टायर जाळून अजित पवारांचा निषेध केला.

भाजपचे  मंत्री अकार्यक्षम

काही मंत्र्यांनी पुरेशी कार्यक्षमता न दाखविल्याने तर काहींना पक्षसंघटनेत जबाबदारी द्यायची असल्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शिंदे गटातही अडीच वर्षे मंत्रिपद

शिवसेनेत अनेक नेत्यांची मंत्रिपद भूषविण्याची कार्यक्षमता असल्याने सर्वांना संधी मिळावी यासाठी अडीच वर्षांसाठी मंत्रिपद देण्याचा निर्णय शिवसेनेने पक्षपातळीवर घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

या माजी मंत्र्यांचे कमबॅक

गेली काही वर्षे सत्तेबाहेर असलेल्या माजी मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात संधी देत त्यांचे सत्तेत पुनरागमन केले आहे. यामध्ये पंकजा मुंडे, गणेश नाईक, संजय सावकारे, जयकुमार रावल, अशोक उईके, आशीष शेलार.

खातेवाटपाची प्रतीक्षाच

मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटपाला दोन दिवस लागणार आहेत. चहापान कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढील दोन दिवसात दोन दिवसात खातेवाटप होईल. त्यामुळे मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना दोन  दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल.  महिला व बाल कल्याण विभाग यापूर्वी पंकजा मुंडे यांनी सांभाळला आहे. त्यानंतर मागील टर्ममध्ये आदिती तटकरे यांच्याकडे या खात्याची सूत्रे होती. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभाग कोणाला मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. गृह विभाग भाजपकडे जाणार हे स्पष्ट आहे. गृहनिर्माण विभागावरही भाजपचे लक्ष आहे.

मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान?

कॅबिनेट

  1. चंद्रशेखर बावनकुळे
  2. राधाकृष्ण विखे-पाटील
  3. हसन मुश्रीफ
  4. चंद्रकांत पाटील
  5. गिरीश महाजन
  6. गुलाबराव पाटील
  7. गणेश नाईक
  8. दादा भुसे
  9. संजय राठोड
  10. धनंजय मुंडे
  11. मंगलप्रभात लोढा
  12. उदय सामंत
  13. जयकुमार रावल
  14. पंकजा मुंडे
  15. अतुल सावे
  16. अशोक उईके
  17. शंभुराज देसाई
  18. आशीष शेलार
  19. दत्तात्रय भरणे
  20. आदिती तटकरे
  21. शिवेंद्रसिंहराजे भोसले
  22. माणिकराव कोकाटे
  23. जयकुमार गोरे
  24. नरहरी झिरवाळ
  25. संजय सावकारे
  26. संजय शिरसाट
  27. प्रताप सरनाईक
  28. भरत गोगावले
  29. मकरंद पाटील
  30. नितेश राणे
  31. आकाश फुंडकर
  32. बाबासाहेब पाटील
  33. प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री

  1. माधुरी मिसाळ
  2. आशीष जैस्वाल
  3. पंकज भोयर
  4. मेघना बोर्डीकर
  5. इंद्रनील नाईक
  6. योगेश कदम

नाराजांना महामंडळाचे गाजर

मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा शहरात पार पडला. त्यामध्ये त्यांनी मंत्रिपदावर भाष्य केले. आज शपथ घेणा ऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी दिली जाईल. मंत्रिमंडळात सर्वांनाच संधी देता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. काही जणांना मागील वेळेस दीड वर्षाची टर्म मिळाली. पण आता पाच वर्षांत मंत्र्यांना अडीच वर्षांची टर्म मिळणार आहे.  मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तीन नेत्यांची एकत्र बैठक होईल. पुढील दोन महिन्यांत महामंडळांवर निवड होणार आहेत, असे सांगत राष्ट्रवादीमधील नाराजांना महामंडळाच्या अध्यक्षपदाचे गाजर दाखवले.

सर्व मंत्र्यांना अडीच वर्षांची टर्म

नव्या मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली तरी सर्व मंत्र्यांना अडीच वर्षांची टर्म मिळेल, असे जाहीर करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या सर्व मंत्र्यांवर टांगती तलवार ठेवली आहे.

भुजबळांची नाराजी आणि गैरहजेरी

मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आणि त्यांनी या बैठकीला दांडी मारली.  भुजबळ समर्थकही आक्रमक झाले आहेत.