मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे हे मला सांगण्यात आले. 13 डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा करत होते. तेव्हाही त्यांनी मला माझे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगितले, पण 15 डिसेंबरला काय झाले याची कल्पना नाही. कोणत्या पेनची शाई होती, हे मला माहीत नाही, असा गौप्यस्पह्ट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केला.
महायुती सरकारच्या मंत्रिमडळ विस्तारात अनेक बडय़ा नेत्यांचा पत्ता कट करण्यात आल्याने नाराजीचे फटाके फुटत आहेत. मुनगंटीवार म्हणाले, मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही. 237 आमदारांपैकी 42 आमदारांना मंत्रिपदाची संधी प्राप्त झाली आहे. विधान परिषदेचा एक आमदार सोडला तर विधानसभेतील 196 आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही. त्यातलाच मी एक आहे. कोणतेही पद शाश्वत नाही. पदे मिळतात आणि जातात. भरती-ओहोटी सुरूच राहते. वक्त आयेगा, वक्त जायेगा’, पण आपले काम करत राहिले पाहिजे. मी पक्षाचे काम करत राहणार आहे.