शरद पवारांच्या नावावर ज्यांनी मते मागितली आणि निवडून आले, त्यांनीच पवारांचे बोट सोडून स्वार्थासाठी गद्दारी केली. साडेतीनशे वर्षांपुर्वी याच संगमेश्वरात जो इतिहास घडला, त्या इतिहासाची पुनरावृत्ती गद्दारीने झाली आहे. ती जखम अजून भळभळतेय. चिपळूण संगमेश्वर मतदार संघात ज्यांनी शरद पवारांशी गद्दारी केली आहे, त्यांना गाडून टाका, असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले. ते चिपळूण येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
अमोल कोल्हे पुढे म्हणाले की, चिपळूणच्या या चौकात आम्ही ज्यांच्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढून भगवा नाचवला होता, त्यांनीच पवारांची साथ सोडली. त्याच गद्दारांना गाडायचं आहे. मी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करतो, तेव्हा जिरेटोप डोक्यावर ठेवतो. आई भवानीची कवडीची माळ गळ्यात घालतो, तेव्हा तेव्हा या गद्दारीच्या जखमेची जाणीव होते. आज तशीच गद्दारी उभ्या महाराष्ट्रात घडली आहे. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले गेले ते केवळ गद्दारीमुळेच. गाफिल महाराजांना पकडले. वार झाला तो महाराष्ट्राच्या पाठीवर, ती जखम अजूनही भळभळतेय असे उदगार खासदार अमोल कोल्हे यांनी काढले.
…तर शिवसैनिक कोणाच्या बापाला ऐकत नाही
उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना वार झाला. सुरत, गुवाहाटीची ही जखम अजूनही भळभळतेय. ही गद्दारी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांच्यासोबत झाली. इथल्या प्रत्येक शिवसैनिकासोबत झाली. शिवसैनिक आता पेटून उठला आहे. शिवसैनिक एकदा का पेटला तर तो कोणाच्या बापाला ऐकत नाही, असा इशाराही अमोल कोल्हे यांनी देताना चिपळूण मतदार संघात तुतारी वाजणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे स्पष्ट सांगितले.
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना राबवून एका हाताने पंधराशे रुपये देऊन दहा हातांनी जीएसटीच्या नावाखाली सरकार लूट करत आहे. जन्माला आलेल्या बाळाच्या लसीपासून मरणाच्या सरणापर्यंत जीएसटी लागू केल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी केला.
तरुणांना रोजगार देण्याची गरज
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणात सांगितले की मतदार संघात खूप काम करण्याची गरज आहे. एमआयडीसीमध्ये गेल्या दहा वर्षांत एकही नवीन प्रकल्प आला नाही. तरुणांना आता रोजगार देण्याची गरज आहे. महिलांना सक्षम करण्याची गरज आहे. तसेच रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे असे यादव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, राडा संस्कृती ही आमच्यामध्ये नाही. आमच्यात संयम आहे. आम्ही आमच्या विचारांनी चालू, पण ज्या दिवशी आमच्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात लागेल, त्या दिवशी आम्ही कोणालाही सोडणार नाही असा इशारा प्रशांत यादव यांनी दिला. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने. माजी आमदार रमेश कदम, सुभाष बने, चिपळूण नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, स्मिता चव्हाण, निरीक्षक बबन कनावजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, रेहमान पठाण, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, उपजिल्हाप्रमुख प्रताप शिंदे, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे आणि शहरप्रमुख शशिकांत मोदी उपस्थित होते.