
उन्हाळ्यात बहुतांशी घरामध्ये जेवणासोबत ताक हे पानात असतेच. आपल्याकडे खूप पूर्वीपासून आहारामध्ये दही आणि ताक हे समाविष्ट आहे. दही ताक हे आहारातील खास महत्त्वाचे पदार्थ मानले जाते. पचनाच्या दृष्टीने दही खाणे हे केव्हाही हितावह आहे. याच दह्याचे ताकही तितकेच फायदेशीर आहे.
खासकरून उन्हाळ्यात ताक पिण्याचे असंख्य फायदे आहेत. शरीराला थंडावा देण्याच्या बरोबरीने, ताक पिण्यामुळे खूप सारे पौष्टीक घटक आपल्या शरीराला मिळतात. म्हणूनच तर उन्हाळी लागण्यापासून दूर राहायचे असेल तर डाॅक्टरही आपल्याला ताक पिण्याचा सल्ला देतात. ताकामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन, पोटॅशियम, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सिडंट हे पौष्टीक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळेच किमान अर्धी वाटी ताक हे आपल्या आहारात दररोज समावेश करणे खूप गरजेचे आहे. ताकात मोठ्या प्रमाणावर प्रोबायोटिक्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यासाठी गरजेचे असतात. तसेच त्यामुळे पचनाशी संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत मिळते.
उन्हाळ्यात ताक पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये शीतलता निर्माण होते. ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणावर आढळतात. यामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. ताकामध्ये असलेले विविध घटक तणाव आणि चिंता कमी करण्यास खूप फायदेशीर ठरतात. ताकामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे शरीराची प्रतिरोधक शक्ती वाढते, यामुळे संसर्ग रोखण्यासाठी फायदा होतो. ताक पिण्याने शरीराला ताजेतवाने वाटते आणि तजेलदार असण्याचा अनुभव प्राप्त होतो.
उन्हाळ्यामध्ये शरीराला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. अशावेळी ताक हा एक उत्तम आणि कमी खर्चिक पर्याय मानला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास खूप होतो, अशावेळी ताक पिण्यामुळे पित्त होण्याची समस्या कमी होते.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. )