
आयुर्वेदानुसार दही आपल्या रोजच्या आहारात असणं हे खूपच गरजेचं आहे. दह्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या बदलांना सुरुवात होते. मुख्य म्हणजे दही केवळ उन्हाळ्यातच नाही तर, सर्व ऋतूंमध्ये दही आहारात असणं हे गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार ताक हे पृथ्वीवरील अमृत आहे. ताक पिणे हे आरोग्यासाठी अमृता इतकेच उपयुक्त आणि महत्त्वाचेही आहे. आहारात ताकाचा समावेश असल्यामुळे पचनाच्या समस्या होत नाहीत. तसेच ताकामुळे शरीराला थंडावाही मिळतो. दूधापासून दही आणि त्यानंतर ताक अशी रितीने आपल्याला ताक मिळते.
ताक पिण्याची योग्य वेळ?
ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ. दुपारच्या जेवणासोबत १ ग्लास ताजे घरी बनवलेले ताक प्यायल्याने अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते. यावेळी ताक प्यायल्याने पोटफुगी, गॅस आणि आम्लपित्त यापासून आराम मिळतो.
ताक पिण्याचे आरोग्यासाठी फायदे
जेवणासोबत 1 ग्लास ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बरेचदा जेवणानंतर गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या उद्भवते, म्हणून जेवणासोबत ताक पिणे हितावह असते.
ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान कमी होते. आपण जास्त तळलेले किंवा मसालेदार अन्न खातो तेव्हा शरीरातील तापमान वाढते.
ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. त्यामुळेच ताक पिण्यामुळे हाडांची मजबूती उत्तम राहण्यास मदत मिळते.
ताक हा एकमेव दुग्धजन्य पदार्थ आहे ज्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. ताक वजन कमी करण्यास आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. दुपारच्या जेवणासोबत ताक प्यायल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
ताकातील महत्त्वपूर्ण घटक रोगांशी लढण्यास मदत करतात. ताक रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.
दुपारच्या जेवणात ताक प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. ताक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.
ताक प्यायल्याने रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो. ज्यांना रक्तदाब असंतुलनाची समस्या आहे त्यांनी ताक प्यावे. यामुळे हृदयरोगांमध्येही आराम मिळतो.
ताकात कमी कॅलरीज असल्यामुळे, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये ताक समाविष्ट करू शकता.
विशेष टिप- रात्री ताक पिणे टाळा कारण त्याचा थंड परिणाम होतो. रात्री ते प्यायल्याने सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून रात्री ताक पिणे टाळावे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)