
हिंदुस्थानच्या उद्योजिका श्रुती चतुर्वेदी यांना नुकताच अमेरिकेच्या विमानतळावर भयंकर अनुभव आला. अमेरिकन पोल आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) यांनी त्यांना आठ तास ताब्यात ठेवले. त्यामुळे त्यांची फ्लाइट चुकली. एवढंच नव्हे तर पुरुष अधिकाऱयाने कॅमेऱयाच्या देखरेखीखाली त्यांची शारीरिक तपासणी केली. त्यांचे उबदार कपडे उतरवले. श्रुती चतुर्वेदी यांच्या हँडबॅगमध्ये एक पॉवर बँक होती. अँकरेज विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱयांना पॉवर बँक संशयास्पद वाटली. त्यामुळे त्यांनी श्रुती यांना आठ तास अडवून ठेवले. आठ तासांमध्ये टॉयलेटला जाण्याचीही परवानगी दिली नाही. याबाबत श्रुती यांनी पोस्ट लिहिली की, “कल्पना करा की तुम्हाला पोलीस आणि एफबीआयने 8 तास ताब्यात घेतले, अत्यंत हास्यास्पद गोष्टींची चौकशी केली, कॅमेऱयासमोर पुरुष अधिकाऱयाने तुमची शारीरिक तपासणी केली, तुमचे गरम कपडे, मोबाईल फोन, पाकीट काढून टाकले, थंड खोलीत ठेवले, शौचालय वापरण्याची परवानगी दिली नाही किंवा एकही फोन कॉल केला नाही, तुमची फ्लाइट चुकवली हे सर्व विमानतळाच्या सुरक्षेला तुमच्या हँडबॅगमधील पॉवरबँक ‘संशयास्पद’ वाटल्यामुळे झाले,’’ असे चतुर्वेदी म्हणाल्या.