चेंबूर येथे भर रस्त्यात व्यावसायिकावर गोळीबार, डायमंड गार्डनजवळ थरार

चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ आज रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली. नवी मुंबईत राहणारा सद्रुद्दीन खान (50) हा त्याच्या गाडीने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात सद्रुद्दीन जखमी झाला. राजरोस गोळीबाराची घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बेलापूरच्या पारसिक हिल येथे राहणारा सद्रुद्दीन खान हा शीव-पनवेल महामार्गाने त्याच्या गाडीने जात असताना चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला हेरले आणि संधी साधत खान याच्यावर गोळीबार केला. यात सद्रुद्दीन हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी चेंबूरच्या झेन इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गोळीबार करून दोघे तेथून पसार झाले. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सद्रुद्दीन याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजते. त्यातून त्याच्यावर हा हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.