शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक 

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास 600 टक्के रिटर्न्स देऊ असे सांगून व्यावसायिकाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

दहिसर येथे राहणारे तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सप्टेंबर महिन्यात त्यांना एका ग्रुपमध्ये जोडले गेले. पैसे गुंतवल्यास 10 टक्के रिर्टन मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना आणखी एका ग्रुपमध्ये जोडले गेले. जर गुंतवणूक केल्यास 600 टक्केप्रमाणे पैसे रिटर्न मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. पैसे कसे गुंतवावे याबाबत त्याने विचारणा केली तेव्हा त्यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. पैसे गुंतवणुकीसाठी विविध बँक खात्यांचे तपशील दिले जात होते.

तसेच गुंतवणूक केल्यावर पैसे काढू शकतो असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून त्याने गुंतवणूक केली. काही दिवसांनी त्यांना एका नंबरवरून मेसेज आला. पंपनीचे एक जण हे स्टॉकमध्ये छेडछाड करत आहेत. छेडछाड करत असल्याने त्याची सेबीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू असल्याने पंपनीचे खाते गोठवण्यात आले आहे. जर आणखी चार लाख रुपये भरल्यास नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. जर पैसे न भरल्यास सेबीकडचे खाते कायमचे बंद होईल अशी त्यांना भीती दाखवली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.