नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याला झळाळी, चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या आजचे दर…

नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात घसरण होत होती. आता नववर्षाची सुरुवात चांगली झाल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. शेअर बाजार आणि जागतिक घडामोडींचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही होत असतो. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात चांगली वाढ झाल्याने सोन्याला झळाळी आली आहे. तर चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली असली तरी वायदे बाजारात चांदीचे दर वधारले आहेत.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर, चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात सरासरी 372 रुपयांनी वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचे दर 76534 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरात 117 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा एक किलोचा दर 85900 रुपये झाला आहे.23 कॅरेट सोन्याचा दर बुधवारी 371 रुपयांनी महागला असून 10 ग्रॅमसाठी 76228 रुपये लागणार आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरातही 341 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेटच्या 10 ग्रॅमसाठी 70105 रुपये लागणार आहेत. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 279 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमचा दर 57401 रुपये इतका झाला आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 217 रुपयांनी वाढून 44772 रुपयांवर गेला आहे.

वायदे बाजारातही एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 147 रुपयांची वाढ झाली आहे. एमसीक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 76894 रुपये आहे. तर चांदीच्या दरात एमसीक्सवर 147 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. तिथं एक किलो चांदीचा दर 87380 रुपये आहे.