स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी अतिदुर्गम कटेझरी गावात पोहोचली बस

गडचिरोली जिह्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली. स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी पहिल्यांदाच कटेझरी ते गडचिरोली बस सेवा सुरू करण्यात आली. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांमुळे ही सेवा शक्य झाली.

गडचिरोली जिह्यातील अनेक दुर्गम गावांत आजही दळणवळणाची प्रभावी साधने नाहीत. त्यामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. धानोरा तालुक्यातील मुरुगगावानजीकचे कटेझरी गावदेखील असेच आहे. या गावापर्यंत शनिवारी एसटीची बस पोहोचली. नागरिकांनी बसचे जोरदार स्वागत केले. कटेझरी ते गडचिरोली बस सेवेमुळे परिसरातील 10 ते 12 गावांतील नागरिकांना लाभ होईल. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फायदा होईल. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बस सेवेचे उद्घाटन केले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर बस मार्गस्थ झाली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून ही बस सेवा सुरू झाली.

यापूर्वी 1 जानेवारी 2025 रोजी गट्टा ते गर्देवाडा आणि वांगेतुरी बस सेवा सुरू करण्यात आली होती. मागील पाच वर्षांत दुर्गम भागात 434.53 किलोमीटर लांबीचे 18 रस्ते आणि 59 पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आले आहे.