तीर्थयात्रेला चाललेली बस दरीत कोसळली, 4 भाविकांचा मृत्यू; 30 जखमी

जगन्नाथपुरी यात्रेला चाललेल्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना बालसोरमध्ये घडली आहे. जलेश्वर बायपासवर बस दरीत कोसळल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे.

उत्तर प्रदेशातील भाविकांची बस तीर्थयात्रेसाठी चालली होती. उत्तर प्रदेशातून 18 सप्टेंबर रोजी बस तीर्थयात्रेला रवाना झाली. यानंतर बिहार, झारखंड आणि कोलकाता अशी यात्रा करत भाविक ओडिशातील जगन्नाथपुरी येथे चालले होते. मात्र जगन्नाथपुरी येथे पोहचण्याआधीच काळाने घाला घातला.

बालासोर जिल्ह्यातील जलेश्वर बायपासजवळ दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळली. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्नीशमन दल आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना जलेश्वरमधील जेके भट्टाचार्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.