10 रुपयांसाठी बसमध्ये तुफान हाणामारी, कंडक्टर आणि निवृत्त IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली. बस कंडक्टर आणि माजी आयएएस अधिकारी यांच्या 10 रुपयांवरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, कंडक्टरने निवृत्त IAS अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जयपूरमध्ये ही घटना घडली. 75 वर्षीय निवृत्त IAS अधिकारी बसने प्रवास करत कनोटा येथे जात होते. बसमध्ये बसल्यावर त्यांनी कनोटाचे तिकीटही काढले होते. दरम्यान अर्ध्या प्रवासात पोहोचताच त्यांना झोप लागली. त्यामुळे त्यांना कनोटा बस स्थानकावर उतरता आले नाही. बस कानोटा येथून निघताच त्यांना जाग आली. आपण बस स्थानकापासून बरेच पुढे आल्याचे कळताच IAS अधिकाऱ्यांनीनी कंडक्टरला बस थांबवण्यास सांगितली.

दरम्यान बस कंडक्टरने बस थांबवली नाहीच. उलट निवृत्त IAS अधिकाऱ्याकडून अधिकचा प्रवास केल्यामुळे आणखी 10 रुपये मागितले. याचा IAS अधिकाऱ्यांना राग आला. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि राग अनावर न झाल्यामुळे आधी IAS अधिकाऱ्यांनी कंडक्टरच्या कानशीलात लगावली. त्यामुळे कंडक्टरनेही अधिकाऱ्यांना चांगला चोप दिला. या प्रकरणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच वाहतूक व्यवस्थापनाने कंडक्टर घनश्याम शर्माला निलंबित केले आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.