जळगावात भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली; एक ठार, 15 प्रवासी जखमी

पुण्यात डंपरच्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता गुजरात-अकोला या मार्गावर धावणाऱ्या लक्झरी बसचा धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्व प्रवशांना तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. सदर बस सुरहून एरंडोल मार्गे मलकापूरला जात होती. धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या पलीकडने जाऊन उलटली. या अपघातात कविता सिद्धार्थ नरवाडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दहा ते पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची मदत केली. तसेच जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अपघाताच्या घटना घडत आहेत. मुंबईत बेस्ट बसचा अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता, तर 42 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पुण्यात मद्यपान केलेल्या डंपर चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांच्या अंगावर डंपर चढविल्याची धक्कादायक घटना घडली होती. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.