रक्ताच्या डागावरून घरफोडी करणारी टोळी पकडली

घरफोडी करताना चोरट्याच्या बोटाला लागलेल्या जखमेच्या रक्ताच्या डागावरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत पाच जणांच्या टोळीतील तीन पुरुष आणि एका महिलेला अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई २७ मार्च रोजी पहाटे करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, काबरानगरात राहणारे विजेंद्र खरात (४६) हे कुटुंबांसह क्रांतीनगर येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले होते. संधी साधत चोरट्यांनी विजेंद्र खरात यांच्यासह त्यांच्या काकाचे घर फोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे ७ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घरफोडीतील गुन्हेगार अली खान सत्तार खान (२१, रा. हनुमान नगर, गारखेडा), अझर मोहम्मद सरवर (२२), अफरोज गुलाब शेख (२०) आणि शाहीन अयाज अहेमद (२४, तिघे रा. काबरानगर, गारखेडा परिसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर सोहेल मोहम्मद सरवर (रा. काबारानगर) हा फरार आहे.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घरातील एका कपाटात रक्ताचे डाग दिसले. त्यांनी ते रक्त फॉरेन्सिक पथकाला बोलावून ते जतन करण्यास सांगितले. पोलिसांना खरात यांच्या शेजारी राहणाऱ्या हिस्ट्रीशीटर अझर सरवर आणि त्याच्या साथीदारांवर संशय आला. त्यानुसार पोलिसांनी वरिल चौघा आरोपींची चौकशी केली. तेव्हा सत्तारच्या बोटाला दुखापत झाल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्याअनुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर साक्षीदारांच्या जाबाबाआधारे वरिल चौघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत मुंढे, मारुती गोरे, मनोज उईके, राठोड, शिंगाणे, महिला अंमलदार राठोड आदींनी केली.

चोरी करून तो कामावर परतला आरोपी 

सत्तार खान हा एका दुकानात कामाला असून, त्याला २२ मार्च दुपारी १२ वाजेच्या सुमारास अझर सरवर याने फोन करून सत्तार खानला घरफोडीची माहिती दिली. त्यानुसार सत्तार तिथे पोहोचला. अफरोज शेखने दरवाजाचे कुलूप दगडाने तोडले. शाहीन अहमद हिने घराबाहेर पहारा दिला, तर अझर आणि सोहेल सरवर यांनी घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम काढली. दरम्यान, सत्तार खान आणि अफरोज शेख खरात यांच्या काकाच्या घरातील कपाट उघडत असताना सत्तारच्या बोटाला जखम झाली. त्याचे रक्त कपाटावर पडले. त्यानंतर सर्व आरोपींनी चोरीचा ऐवज शाहीनकडे दिला. तिने दहा हजार रुपये सत्तार याला दिले व सोन्याचे पैसे नंतर देते असे सांगितले. त्यानंतर सत्तार हा पुन्हा कामावर गेला.