बॉर्डर-गावस्कर मालिकेतीत अंतिम सामना सिडनीमध्ये सुरू आहे. हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. मात्र हा निर्णय हिंदुस्थानच्या अंगलट आला आणि हिंदुस्थानचा संपूर्ण संघ 185 धावांमध्ये गारद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजा याला बाद केले. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा तरुण खेळाडू सॅम कोनस्टास आणि हिंदुस्थानचा कर्णधार जसप्रीत बुमराह यांच्यात जोरदार राडा झाला. त्यामुळे सिडनीच्या मैदानावरील वातावरण तापले आहे.
View this post on Instagram
नक्की काय घडलं?
हिंदुस्थानला कमी धावसंख्येत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोनस्टास आणि उस्मान ख्वाजा सलामीला आले. सिडनीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज आग ओकत होते. त्यामुळे अधिक षटकांचा सामना करावा लागू नये म्हणून ख्वाजा आणि कोनस्टास वेळ वाया घालत होते. तिसऱ्या षटकातही असाच प्रकार घडला.
चौथा चेंडू टाकण्यासाठी बुमराह रन अप घेत असताना ख्वाजाने त्याला थांबवले. बुमराहने यावर आक्षेप नोंदवल्यावर नॉन स्ट्राईकला उभ्या कोनस्टासने आगाऊपणा केला आणि वाद उकरून काढला. त्यानंतर बुमराहच्या संतापाचाही पारा चढला आणि तो कोनस्टासच्या दिशेने बडबड करत गेला. मात्र पंचांनी मध्यस्थी केल्याने तो प्रकार तिथेच मिटला.
पाचवा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर उस्मान ख्वाजा स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. केएल राहुलने त्याचा झेल घेतला. यानंतर जसप्रीत बुमराहसह संपूर्ण संघ कोनस्टासच्या समोर येऊन जल्लोष करू लागला. त्यावेळी बुमराहचा रुद्रावतार पाहून सर्वच अचंबित झाले. आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही दोन्ही संघामध्ये विकेट आणि धावांसाठी मैदानात घमासान होणार हे निश्चित.