
सहा महिन्यांच्या घसरणीनंतर गेल्या आठवडय़ात शेअर बाजारात तेजी दिसून आली. या तुफानी तेजीमुळे शेअर बाजारात बुल रन सुरू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने वेग पकडला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्येही उत्साह दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या बुल रनचा जबरदस्त फायदा झाला. पाच दिवसात गुतंवणूकदारांची 50 हजार कोटींची कमाई झाली.
गेला आठवडा शेअर बाजारासाठी खूप सकारात्मक ठरला. बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 3,076.6 अंकांनी म्हणजेच 4.16 टक्क्यांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 95.3 अंकांनी म्हणजेच 4.25 टक्क्यांनी वधारला आहे. सेन्सेक्सच्या टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजारमूल्य मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची जबरदस्त कमाई झाली आहे. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
सगळेच मालामाल
शेअर बाजारातील तेजीच्या काळात, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनेही गुंतवणूकदारांना मालामाल केले. दुसरी सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी बँक ठरली होती. तर तिसरी टीसीएस होती. त्यानंतर अनुक्रमे भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्पहसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी यांचा क्रमांक लागतो.
बाजारात गेल्या आठवडय़ात तेजी दिसून आली असली तरी सोमवारी बाजाराची सुरुवात कशी होते, यावर पुढची दिशा ठरणार आहे. आता आगामी काळात तेजी कायम राहील, असे तज्ञांचे मत आहे.