पंजाबच्या गव्हामुळे बुलढाण्यात टक्कल पडण्याचा आजार, रेशनच्या दुकानातून पसरतोय व्हायरस; डॉ. हिंमतराव बाविस्करांचा अहवाल

बुलढाण्याच्या शेगाव आणि नांदुरा येथे केसगळतीने लोक प्रचंड हैराण आहेत. टक्कल पडण्याच्या या आजाराची चर्चा देशभरात झाली. त्यानंतर टक्कल पडण्याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकही बुलढाण्यात पोहोचले, परंतु त्यांनाही अपयश आले. आता रायगडमधील बाविस्कर रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक ‘पद्मश्री’ डॉ. हिंमतराव बाविस्कर यांनी पंजाबच्या गव्हातील व्हायरसमुळे बुलढाण्यात टक्कल पडण्याचा आजार आल्याचा दावा केला आहे. पंजाबमधील रेशन दुकानांमधून वितरित करण्यात येणाऱ्या गव्हातून हा व्हायरस पसरत असल्याचे डॉ. बाविस्कर यांनी म्हटले आहे. या गावात मोठय़ा प्रमाणावर पंजाबमधील गव्हाचे सेवन केले जात आहे. पंजाब आणि हरयाणाच्या गव्हामध्ये मोठय़ा प्रमाणावर सेलेनियम हा घटक आहे. हाच गहू बुलढाण्यात रेशन दुकानांच्या माध्यमातून वितरित करण्यात आल्याचे डॉ. बाविस्कर यांनी म्हटले आहे.

गव्हात 600 पट सेलेनियम

पंजाबमधील गव्हात 600 पटीहून अधिक सेलेनियम हा घटक आहे. या घटकामुळेच बुलढाण्यात लोकांमध्ये केसगळतीचे प्रमाण वाढल्याचा दावा डॉ. बाविस्कर यांनी केला आहे. लक्षणे दिसल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत लोकांना टक्कल पडत आहे, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. गव्हातील सेलेनियम या घटकाचे रक्त, मूत्र आणि केसामध्ये वाढल्यामुळे केसगळती होत असल्याचे बाविस्कर यांनी म्हटले आहे. दरम्यान, सेलेनियम हा घटक जमिनीत किंवा नैसर्गिक जल आणि अन्नातही आढळतो. लोकांना त्याची अत्यंत कमी प्रमाणात गरज असते, परंतु त्याचे प्रमाण वाढल्यानंतर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतो.