Buldhana News : मदतीसाठी थांबला अन् घात झाला, चोरट्यांनी एक लाख रुपये केले लंपास

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरानजीक दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये चोरीची घटना घडली आहे. मेहकर बायपासवरून चाललेल्या दुचाकी स्वाराला अडवून चोरांनी एक लाख रुपये नगदी व पाच हजार रूपयांचा मोबाइल लंपास केला. दोन दिवसांपूर्वी अशीच चोरीची एका महिलेसोबत घडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर बायपासवर काल (17 जुलै) दुपारी दीडच्या सुमाराज चोरीची घटना घडली. तालुक्यातील आरेगाव येथील रहिवासी संतोष उकंडा साखले व त्यांचे नातेवाईक हे दुचाकीवरून तळणी (ता. मंठा जि. जालना) येथे गेले होते. तळणी येथून नातेवाईकांकडून पैसे घेऊन ते पुन्हा त्यांच्या मुळ गावी आरेगावच्या दिशेने मार्गस्थ झाले. याच दरम्यान मेहकर बायपासने जाताना वृंदावन हॉटेल जवळ एका अज्ञान व्यक्तीने पेट्रोलसाठी संतोष यांची दुचाकी थांबवली. खऱ्या अर्थाने इथेच घात झाला आणि दुचाकी थांबताच दबा धरून बसलेले चोराचे इतर तीन साथीदार बाहेर आले व त्यांना दमदाटी करायला सुरुवात केली. चौघांनी मिळून पीडित संतोष यांच्या खिशातून एक लाख रुपये चोरले. तसेच पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेत तिथून पळ काढला. त्यानंतर पीडित संतोष यांनी मेहकर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून API संदीप बिरांजे सदर घटनेचा तपास करत आहेत.