
संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित 131 वा श्रीराम नवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध नवमी, रविवार 6 एप्रिल 2025 रोजी संपूर्ण शेगाव नगरीत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ च्या जयघोषात भक्तीचा महासागर अवतरला.
यंदाच्या उत्सवात 869 भजनी दिंड्यांचा सहभाग आणि एक लाखांहून अधिक भाविकांचे आगमन झाले. संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी संत नगरी दुमदुमून टाकली. धार्मिक कार्यक्रम आणि सोहळ्यास 2 एप्रिलपासून यागास व आध्यात्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता यागाची पूर्णाहुती करण्यात आली. त्यानंतर ठीक 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा, फुलांचा वर्षाव, गुलाल उधळण, टाळ-मृदंगांच्या गजरात पार पडला. दुपारी 4 वाजता भव्य पालखी सोहळा नगरपरिक्रमेसाठी मार्गस्थ झाला.
पालखीसोबत रथ, अश्व, मेणा, पताका आणि हजारो वारकरी सहभागी झाले. सायंकाळी 6 वाजता महाआरती आणि रिंगण सोहळा संपन्न झाला. 7 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता काल्याच्या कीर्तनाने व गोपालकाल्याने उत्सवाची अधिकृत सांगता होईल. मंदिर व परिसरात फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, आंब्याच्या पानांचे तोरणे, भगवे ध्वज यांनी सुशोभीकरण करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी एकेरी मार्ग, प्रथमोपचार सुविधा, भोजन-प्रसाद, आणि विसावा संकुल उपलब्ध होते. 869 दिंड्यांपैकी 90 नव्या दिंड्यांना संत साहित्य व भजनी साहित्य वितरित करण्यात आले. शेगावासह संस्थानच्या पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा शाखांवरही रामनवमी उत्सव साजरा झाला आणि दीड लाख भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सतत चालणारा नामजप, भक्तांची दर्शन रांगेतील शिस्त, सेवेकरी वर्गाची समर्पित सेवा या सर्व उपक्रमांना भाविकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे उत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित झाले. शहरभर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही अनुचित घटना घडू न देता उत्सव शांततेत पार पडला. श्रीराम नवमी उत्सवाला शेगावमध्ये विशेष महत्त्व आहे, कारण श्री गजानन महाराजांचे श्रीरामचंद्र हे दैवत होते आणि त्यांच्या भजनी परंपरेतही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचे विशेष स्थान आहे.