Buldhana News – विषारी नायट्रेटमुळे गळताहेत गावकऱ्यांचे केस, पाण्याच्या तपासणीनंतर कारण आलं समोर

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक गावकऱ्यांची केस गळती होत असल्याचे उघड झाले होते. केवळ तीन दिवसात नागरिकांना टक्कल पडत आहे. ही घटना उघडकीस येताच आरोग्य विभागाने तात्काळ गावात धाव घेत विविध तपासण्या सुरू केल्या. या तपासणीच्या अहवालात केस गळती प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. वापरण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक आढळल्याने केस गळती होत असल्याचे अहवालात समोर आलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्याची तपासणी केली. या पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला असून पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे.

गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय. पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं पाणी तपासणी अहवालात निष्पन्न झालं आहे.