बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायी, 36 जनावरे पकडली

बुलढाणा येथील हिंदू राष्ट्र सेना जिल्हा अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी मेहकर जवळील बाभुळखेड पुलावर समृद्धी महामार्गाने कंटेनर मधून जालना कडे कत्तलीसाठी जाणार्‍या चार गायी व 36 जनावरे पकडून पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील अंत्री देशमुख येथील गोरक्षण मध्ये जमा केले.

हिंदू राष्ट्र सेना जिल्हा अध्यक्ष विजय पवार यांनी पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की त्यांना 13 जुलै रोजी रात्री अंदाजे साडे दहाला मोनु संतोष अवस्थी यांचा फोन आला की मालेगाव, जि. वाशीम कडून कंटेनर मध्ये समृद्धी मार्गाने गायी कत्तलीसाठी जालना कडे जात आहे. तेव्हा आपण त्यांना पकडु म्हणून तुम्ही शहरातील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ या असे सांगितले. त्यानुसार विजय पवार, मोनु अवस्थी, अवि भास्कर जाधव, सुनील संजय राऊत, शुभम अशोक कदम, कृष्णा गणेश खोडके, गोपाल विष्णू देशमुख हे सर्व जण कारने समृद्धी महामार्गाने तालुक्यातील बाभुळखेड फाट्यावर समृद्धी रस्त्यावर उभे राहिले. कंटेनर येताच त्याला अडवून चालकाकडे विचारपूस केली असता त्याने बैल असल्याचे सांगितले. या मंडळींनी स्वतः बघितले असता4 गायी व 36 जनावरे क्रूरपणे बांधलेली आढळली. हे कंटेनर नंतर पोलीस ठाण्याला आणले. पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील अंत्री देशमुख येथील गोरक्षण मध्ये जमा केले.

याप्रकरणी पोलिसांनी महंमद हुसेन यासीन खान, हमीद जिवा खान, आसाराम भिल सर्व रा. राजस्थान यांना ताब्यात घेतले असून कंटेनर व जनावरे मिळुन अंदाजे 12 लाखाचा मुद्दे माल जप्त केला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कोरडे करीत आहेत. शहरातील रामनगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गायी, गोर्‍हे बसतात. त्यांची सुद्धा अज्ञात आरोपीकडून चोरी सुरूच आहे. मात्र अद्यापही मेहकर पोलिसांनी आरोपीला पकडलेले नाही.