आईच्या गर्भात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ आढळून आल्याची दुर्मीळ घटना बुलढाण्यातून समोर आली होती. 1 फेब्रुवारी रोजी महिलेची प्रसूती करण्यात आली असून आई आणि बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे. तसेच नवजात बालकाला पुढील उपचारांसाठी अमरावती येथे हलवण्यात आले होते. नवजात बालकाचे तज्ञ डॉक्टरांनी ऑपरेशन केले असता बाळाच्या पोटात दोन अर्भक आढळून आली आहेत. अर्थात सदर महिलेला जुळे नव्हे तर तीळ होण्याची प्रक्रिया सुरू होती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे
जवळपास 5 लाखांमधून अशी एक घटना घडत असते. या घटनेला ‘फीट्स इन फिटू’ असे म्हटले जाते. बुलढाण्याच्या इतिहासातील ही पहिली घटना असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे एका महिलेच्या बाबतीत ही घटना 26 जानेवारी रोजी समोर आली. त्यानंतर 1 फेब्रुवारीच्या रात्री त्या महिलेची प्रसुती जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे चार ते पाच तज्ञ डॉक्टरांनी सुरक्षीतरीत्या केली. महिलेला मुलगा झाला होता आणि या नवजात मुलाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आले होते. त्या बाळावर अमरावती येथे तज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या बाळाच्या पोटात दोन गर्भ आढळून आले होते. दोन्ही गर्भ डॉक्टरांनी सुरक्षीतरित्या काढले आहेत. त्या नवजात बालकावर अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली आहे. ही शस्त्रक्रिया अमरावतीच्या इतिहासातील पहिली घटना असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. बाळाची आई व बाळ दोघेही सुरक्षीत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली आहे.