गोरेगावातील संक्रमण शिबिराची इमारत धोकादायक, 70 कुटुंबांच्या डोक्यावर भीतीचा स्लॅब; रहिवाशांचा जीव टांगणीला

जर्जर भिंती, पिलरला गेलेले तडे, तुटलेल्या पायऱ्या, वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली लिफ्ट अशी भयावह अवस्था गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील आर 10 या संक्रमण शिबिराच्या इमारतींची झाली आहे. या धोकादायक संक्रमण शिबिरामुळे येथील शेकडो कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला असून भविष्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

गोरेगाव पश्चिम राम मंदिर रोडवरील शिवाजी नगर येथे असलेल्या दयाराम यादव चाळीचा पुनर्विकास करताना चाळीतील 289 रहिवाशांचे आर 1 आणि आर 10 या संक्रमण शिबिराच्या इमारतीत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले. पुढे जे रहिवासी पात्र ठरले त्यांना आर 9 आणि आर 12 मध्ये घराचा कायमस्वरूपी ताबा दिला गेला.  कोर्ट केस सुरू असलेले रहिवासी अजूनही या संक्रमण शिबिराच्या इमारतीत राहतात. सात मजली या इमारतीत एकूण 134 फ्लॅट असून येथील 70 गाळय़ांमध्ये रहिवासी राहतात. सध्या ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे. 2018 मध्ये व्हीजेटीआयने ऑडिट केले त्यात दुरुस्तीची सूचना करण्यात आली होती, मात्र आजतागायत या इमारतीची दुरुस्ती झालेली नाही.

तर आम्हीच पुनर्विकास करू

धोकादायक संक्रमण शिबिरात राहणे आता कठीण झाले असून तात्पुरते आम्हाला दुसऱ्या संक्रमण शिबिरात शिफ्ट करावे अथवा एमएमआरडीएने या जागेचा ताबा आम्हाला दिल्यास आम्हीच पुनर्विकास करू, अशी मागणी रहिवाशांनी केली.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

आर 10 इमारतीच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. तळमजल्यावर सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढलाय. रहिवाशांना नाकावर रुमाल ठेवूनच इमारतीत प्रवेश करावा लागतो. त्यामुळे येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून साफसफाई होत नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.

एमएमआरडीएला शिवसेनेचा इशारा

रहिवाशांच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक, विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांनी यासंदर्भात नुकतेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्तांना निवेदन दिले. एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ या इमारतीची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही या परिसरात रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा विधानसभा संघटक माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिला. यावेळी सत्यप्रकाश राम यादव, शिवशंकर यादव, मनोज सिंग, प्रकाश निवाते, दयानंद शिंदे, पिंटू सिंग, राधेश्याम यादव, समशेर सिंग, अखिलेश यादव, जयशंकर यादव, राजेश तिवारी, त्रिभुवन तिवारी, नीलम, छोटेलाल यादव, तीर्थराज यादव, शकुंतला तिवारी, सभाजीत यादव, राकेश तिवारी आदी रहिवासी उपस्थित होते.