सरकार आणि सिडकोत बिल्डरांचे दलाल

सिडको व शासनात बिल्डर लोकांचे दलाल आहेत. या दलालांमुळे जनतेच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे. हे गांभीर्याने बोलतो. मला कोणाचे भय नाही, अशा शब्दांत भाजप आमदार गणेश नाईक यांनी आज विधानसभेत सरकारला घरचा अहेर दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नवी मुंबई महापालिकेला सिडको प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड मिळावेत, अशी मागणी गणेश नाईक यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

यावेळी बोलताना त्यांनी सरकारचे वाभाडे काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जून 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. या बैठकीत विविध निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, एमआयडीसीचे अधिकारी आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एकत्रितपणे प्रश्न सोडवावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला, पण तेरा महिने झाली तरी पुढे काहीच झाले नाही. प्रशासनाने बैठकीत झालेल्या निर्णयांचे बारा वाजवायचे ठरवले आहेत, अशी टीका नाईक यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना पाच पैशाची किंमत नाही
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जे इतर प्रश्न आहेत त्याचाही निपटारा होत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा की, मुख्यमंत्र्यांना आम्ही पाच पैशाची किंमत देत नाही. मग आम्ही लोकांना सांगू की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशाची किंमत नाही, अशा शब्दांत गणेश नाईक यांनी संतापाला वाट करून दिली. या लक्षवेधी सूचनेवर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. यासंदर्भात आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे स्वायत्त अधिकार तसेच कायम ठेवण्याचे आणि बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यास सांगितले आहे. पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी या विषयावर अंतिम बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सामंत यांनी सांगितले.