जाहिरातीत रेरा क्रमांक, क्यूआर कोड नसल्यास बिल्डरला 50 हजारांचा दंड

गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत यापुढे महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा संकेतस्थळाचा तपशील, क्यूआर कोड आणि संबंधित प्रकल्पाच्या जाहिरातीतील संपर्क क्रमांक आणि पत्ता छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय हा सर्व तपशील जाहिरातीच्या वरील भागात उजवीकडे रंगीत मजकुरात छापणे अत्यावश्यक आहे. याबाबतचे निर्देश महारेराने एका परिपत्रकाद्वारे जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकांवर 50 हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. त्यानंतरही दहा दिवसांत चुकीची दुरुस्ती न केल्यास त्या बिल्डरवर कडक कारवाई केली जाणार आहे.
विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांत जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, समाजमाध्यमांच्या मार्फत जाहिराती करीत असतात. कुठलेही माध्यम वापरून केल्या जाणाऱया जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक, महारेरा संकेतस्थळ, क्यूआर कोड विहित आकारात छापणे बंधनकारक आहे, परंतु अनेकदा या बाबी जाहिरातीत शोधाव्या लागतात  अशा पद्धतीने छापल्या जातात, असे महारेराच्या निदर्शनास आले आहे.  त्यातच महारेराने क्यूआर कोड बंधनकारक यासाठी केलेला आहे. परंतु अनेकदा हे क्यूआर कोड स्कॅनच होत नाहीत. त्यामुळे महारेराने हे कडक पाऊल उचलले आहे.