हनुमान मंदिराजवळील रेल्वे फाटक ओलांडताना शुक्रवारी दोनजणांचा जीव गेला तर एकजण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्या अपघातस्थळी लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल बांधावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास यापुढेही अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या त्या ठिकाणी रेल्वेने पत्र्याची भिंत उभारल्याने नागरिकांचा मार्गच बंद झाला असून त्यामुळे त्यांची फरफट होत आहे.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ बंद अवस्थेत असलेले रेल्वे फाटक ओलांडताना दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने लगेच पत्रे लावून तो मार्गच बंद करून टाकला. पूर्व व पश्चिमेला जोडणारा तो एकमेव मार्ग होता. रोज हजारो नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणाहून प्रवास करतात. मात्र आता हा रस्ता बंद झाल्याने रहिवाशांना जायचे कुठून, असा प्रश्न पडला आहे.
गावित यांनी आम्हाला फसवले
आमदार राजेंद्र गावीत यांनी आज तातडीने धाव घेऊन स्थानिकांशी चर्चा केली आणि आपण पादचारी पूल बांधण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली. पण प्रत्यक्षात रेल्वेने कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे गावीत यांनी नागरिकांची थातूरमातूर समजूत काढून काढता पाय घेतला. यावेळी आश्वासन देऊनही गावित यांनी फसवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.