Budget 2025 – कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून लोकसभेत हंगामा; गदारोळातच अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात, विरोधकांचा सभात्याग

लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्याआधी जोरदार हंगामा झाला. समाजवादी पक्षाच्या आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणा दिल्या. कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची यादी जाहीर करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना शांततेचं आवाहन केलं. गदारोळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. यामुळे विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

लोकसभेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात घोषणा देण्यास सुरुवात केली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या पक्षाचे खासदार आणि विरोधी पक्षांतील खासदारांनी घोषणा दिल्या. उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात काही दिवसांपूर्वी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीतील मृतांची यादी जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. मरने वालों की सूची दो…, हिंदू विरोधी सरकार नहीं चलेगी… अशा घोषणा खासदारांनी दिल्या.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना शांत राहण्याच आवाहन केलं. मात्र, विरोधी पक्षांच्या घोषणा सुरू राहिल्याने ओम बिर्ला यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्प सादर करण्याची सूचना केली. विरोधी पक्षांच्या गदारोळातच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. यामुळे सरकारचा निषेध करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला.