Budget 2025 – इन्कम टॅक्समधील सूट म्हणजे उंटाच्या तोंडात जिरं, फक्त 6 कोटी करदात्यांना होणार फायदा! माजी अर्थमंत्र्यांनी लगावला टोला

केंद्रीय अर्थसंकल्पातून 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. पण ही घोषणा किती फुसकी आहे? तिचा किती नागरिकांना फायदा होईल? याची आकडेवारी मांडत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा ही उंटाच्या तोंडात जिरं, अशी असल्याची टीका यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

मागील अर्थसंकल्पांप्रमाणे या अर्थसंकल्पावर एक-दोन दिवस जोरदार चर्चा होईल. मग सगळे लोक हे विसरून जातील आणि आपल्या कामकाजाला लागतील. अर्थसंकल्पाबद्दल लोकांमध्ये फारशी उत्सुकता दिसून आली नाही. पण या अर्थसंकल्पातून सर्वात मोठा फायदा मध्यमवर्गाला होईल. मध्यमवर्गातही जे इन्कम टॅक्स भरतात, त्यांना सूट मिळाली आहे. त्यातून काही पैसा हाती येईल, हा पैसा नागरीक बाजारात खर्च करतील आणि त्यामुळे बाजारा एक नवा उत्साह निर्माण होईल, अशी अपेक्षा असल्याचे यशवंत सिन्हा म्हणाले.

सध्या बाजारात एक प्रकारची उदासी आहे. बाजारात खर्च करण्यासाठी लोकांजवळ पैसा नाहीये. पण असे किती लोक आहेत, जे इन्कम टॅक्स भरतात. त्यांची संख्या खूप कमी आहे. देशातील 143 कोटी जनतेपैकी टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 6 कोटीहूनही कमी आहे. त्यामुळे जीएसटी काही सूट दिली असती तर बाजारात माल स्वस्त झाला असता. त्यामुळे खप वाढून बाजारात चैतन्य निर्माण झाले असते. ते नाही झाले, असे यशवंत सिन्हा म्हणाले.

आपल्या इतक्या मोठ्या देशात इन्कम टॅक्समधील जी सूट आहे त्याचा फायदा फार मर्यादित असेल. बाजारात यामुळे उसळी येईल असे वाटत नाही, असे म्हणत यशवंत सिन्हा यांनी टीका केली. 143 कोटी लोकसंख्येच्या देशात 12 कोटी लोक इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करतात. त्यापैकी 6 कोटी लोक हे नील रिटर्न फाइल करतात. फक्त नावाला टॅक्ट रिटर्न फाइल करतात. उर्वरित जे 6 कोटी लोक आहेत, तेच फक्त इन्कम टॅक्स भरतात. त्यात त्यांना सूट मिळाली आहे. म्हणजेच 143 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त 6 कोटी लोकांना फायदा होणार आहे. म्हणजेच उंटाच्या तोंडात जिरं, असा प्रकार असल्याचे म्हणत यशवत सिन्हा यांनी टोला लगावला.