Budget 2025 – अर्थसंकल्पाने निराशा केली, देशाला विकसीत कसे करणार? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीही नसल्याने यावर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही अर्थसंकल्पाबाबत अनेक सवाल उपस्थित करत अर्थसंकल्पाने निराशच केली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अर्थसंकल्पामुळे प्रचंड निराशा झाली आहे. देशाच्या विकाससाठी, शेतकऱ्यांसाठी वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे आणि ठोस निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात तसे काहीही करण्यात आलेले नाही. निवडणुकांनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने काही ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज होती. मात्र, अर्थसंकल्पात काहीही ठेस करण्यात आलेले नाही.

शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणांची गरज होती. देशातील आयआयटी सारख्या संस्थेत अनेक जागा रिक्त असल्याने शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. देशात सर्वत्र शिक्षणाची अशीच स्थिती आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि जनतेला चांगल्या आरोग्यसुविधा मिळण्यासाठी ठेस तरतूदींची गरज होती. मात्र, अर्थसंकल्पात या क्षेत्रांकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. बिहारमधील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत बिहारसाठी ताही घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे बिहारच्या मूलभूत स्थितीत कोणतीही सुधारणा होणार आहे का, असा सवालही त्यांनी केला आहे.

देशाला विकसित करत महासत्ता बनण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्यात येत आहे. 2047 पर्यंत आपला देश विकसित झाले असेल, असे सांगण्यात येते. मात्र, देशाला विकसित करण्यासाठी देशाचा वार्षिक वाढीचा दर 9 ते 10 टक्के असायला हवा. मात्र, तो 6 ते 6.5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आर्थिक वाढीचा दर आणि जीडीपी घसरला असताना विकसित देश होण्याचे ध्येय कसे साध्य करणार, असा सवालही त्यांनी केला. या अर्थसंकल्पामुळे घोर निराशा झाल्याचेही ते म्हणाले.