अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या भाषणात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई व महाराष्ट्राचा उल्लेखच करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणूकीत भाजपचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. भाजप महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाला. त्याचा राग या अर्थसंकल्पातून काढल्याची चर्चा सध्या रंगली आहे. संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणात निर्मला सीतारामन यांनी फक्त बिहार, आंध्र प्रदेश, ओ़डीशा, झारखंड या राज्यांचा उल्लेख केला. बिहार व आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या पाठिंब्यावर सध्या केंद्र सरकार उभे राहिले आहे. त्यामुळे या दोन राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. तर झारखंडमध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने केंद्र सरकारने या चार राज्यांसाठी पूर्वोदय योजना लागू केली आहे.
देशाला सर्वात जास्त करातून मिळकत ही मुंबई महाराष्ट्रातून मिळते. म्हणून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील सरकार मुंबई महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याच्या मागे असल्याचा आऱोप विरोधकांकडून होत आहे. मुंबईतील अनेक उद्योगधंदे हे गेल्या काही वर्षात गुजरातला पळविण्यात आले आहेत. मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र देखील गुजरातला हलविण्यात आले आहे.
आता या अर्थसंकल्पात मुंबई महाराष्ट्राला अक्षरश: ठेंगा दाखवण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलबाबतीतही काहीच घोषणा करण्यात आलेली नाही. एकंदरीत भाजपने या अर्थसंकल्पात मुंबई महाराष्ट्राकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.