बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही. महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या. महाराष्ट्रात डबल इंजिन आणि टिबल इंजिनचं सरकार आहे म्हणणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसली आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी बजेटवरून केंद्र सरकारला धारेवर धरले. आज देशातल्या दोनच राज्यांवर विशेष सवलतींचा वर्षाव होत आहे. मला वाटतय महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत. महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचे काम भाजपच्या केंद्र सरकारने केले आहे. अशी जळजळीत टीका जयंत पाटील यांनी केली.
दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही नाही. यामध्ये एकच योजना अशी दिसते. ज्यामध्ये लँड रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा त्यांचा विचार दिसतोय. त्याव्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागांसाठी विशेष यांनी काही केले नाही, असे शेतकऱ्यांच्या मुद्यावरून जयंत पाटील म्हणाले.
तीन कोटी घरे बांधणार अशी घोषणा करण्यात आली, पण काम सुरू आहेत त्या घरांना दुसरा आणि तिसरा अँडवान्स अजून आलेला नाही. त्यांचे पैसे आलेले नाहीत. त्यामुळे पुढच्या अशा सगळ्या घोषणा या वाऱ्याची वरात आहेत. त्यामुळे यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. असे म्हणत केंद्र सरकारच्या फसव्या घोषणांवरून जयंत पाटील यांनी भाजपला सुनावले.
महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना, कपास उत्पादकांना, सोयाबीन, केळी, संत्रा उत्पादकांना अशी एखादी पॉलिसी पाहिजे होती, की ज्याच्यामुळे मन मानेल त्यावेळी केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणू शकणार नाही. पण त्याचा साधा उल्लेखही बजेटमध्ये दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला यातून काही आलेले नाही. कांदा उत्पादकांचा द्वेष सरकार करतयं असे मी म्हणेन, कारण कांदा उत्पादकांच्या निर्यातीवर बंदी आणली, मध्येच गुजरातला थोडी परवानगी दिली. त्यानंतर सगळीकडे दंगा झाल्यावर थोडीफार परवानगी वाढवली. त्यामुळे या भागातील सगळ्या शेतकऱ्यांना प्रचंड भुर्दंड बसला. संत्रा, कपाशी, केळी या उत्पादकांना सुद्धा याचा फटका बसला. असे म्हणत शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काही नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.
सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहार या दोन राज्यांना अधिक निधी दिला आहे. स्कीलची भाषा आता करायला लागले. ज्यावेळी त्यांच्या दहा वर्षांच्या काळात या देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे या देशातील बेकारीचा दर 45 वर्षांतील सर्वोच्च दर आहे. आता यांना स्किल डेव्हलपमेंटच्यावर काही विशेष सोय करण्याची गरज वाटत आहे. पण त्याला आता बराच उशीर झालेला आहे. मोठमोठ्या घोषणा जरी असल्या तरी डिलीवरी काय असते हे देशातल्या लोकांना माहित आहे. असे म्हणात देशातील लोकांना गृहीत न धरण्याची चूक केंद्राने करू नये, असा इशारा जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
बहीण झाली आता लाडका काका, लाडका पुतण्या, लाडकी पत्नी असे सगळे नातेवाईक लाडके करा, ठरावीक नको. आता लाडका भाऊ योजना आणलीये त्यामुळे मला खात्री आहे अशीही योजना सरकार आणेल. लाडकी बहीण योजनेवरून मिंध्यांना जयंत पाटील यांनी टोला लगावला.