
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रिमो मायावती यांच्या भाचीने पतीसह सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला असून पोलिसात धाव घेतली आहे. मायावती यांची भाची एलिसने पती नपुंसक असल्याचाही आरोप केला आहे. यानंतर न्यायालयाच्या निर्देशावरून पोलिसांनी पती, सासू, सासरे, नणंद, मेहुणा आणि वहिनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 7 जणांवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी शारीरिक आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मायावती यांची भाची एलिस हिचे वकील राजीव शर्मा यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, 9 नोव्हेंबर 2023 रोजी विशालशी विवाह झाला होता. नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. यानंतर पती, सासरे श्रीपाल, सासू पुष्पा देवी, मेहुणा भूपेंद्र, वहिनी निशा यादव, मावस सासरे अखिलेश यांनी हुंड्याची मागणी केली. पीडितेची सासू पुष्पा देवी या हापूड नगर परिषदेच्या माजी अध्यक्षाही आहेत.
लग्न झाल्यापासून राजकीय दबावाचा वापर करत हुंड्याची मागणी केली. आरोपींनी पीडितेकडे 50 लाख रुपये लोख आणि गाझियाबादमधील इंदिरापुरा येथे एक फ्लॅट देण्याची मागणी केली. मायावती या बहुजन समाज पार्टीच्या सुप्रिमो असून त्यांच्याकडे अमाप पैसा असेल असा तर्क लावत ही मागणी करण्यात आली होती. तसेच हुंड्यात बसपाचे तिकीटही मागण्यात आले होते. मात्र पीडितेने यास विरोध केल्यानंतर तिला शिवीगाळ करण्यात आली. तिचा शारीरिक आणि लैंगिक छळ करण्यात आला.
पीडितेच्या पतीने बॉडीबिल्डिंगसाठी स्टेरॉइड्सचे सेवन केलेले होते. स्टेरॉइड्सच्या अति वापरामुळे तो नपुंसक झाला आहे. वैवाहित जीवनासाठी वैद्यकीदृष्ट्या तो अयोग्य असल्याची माहिती त्याचा कुटुंबालाही होती, मात्र ही बाब पीडितेपासून लपवून ठेवण्यात आली. तसेच मुल हवे असल्यास मेहुण्याशी संबंध ठेवण्याचाही सल्ला दिला, असा आरोप पीडितेने केला.
17 फेब्रुवारी रोजी सासरे आणि मेहुण्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचाही प्रयत्न केला. यानंतर पीडिता आई-वडिलांच्या घरी परतली. याबाबत पोलीस तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने पीडितेने न्यायालयात धाव घेतली. आता न्यायदंडाधिकारी डॉ. ब्रह्मपाल सिंह यांच्या निर्देशानुसार हापूड नगर कोतवाली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे, असे पोलीस अधिकारी मुनीश प्रताप सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी भादवि कलम 85, 115(2), 351(2), 75, 76 आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.