
22 एप्रिलला जम्मू कश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हिंदुस्थानचा बीएसएफचा एक जवान चुकून सीमा पार पाकिस्तानमध्ये पोहोचला. तिकडे पाकिस्तानी सैनिकांनी त्याला ताब्यात घेहतले. पूर्णम कुमार असे त्या जवानाचे नाव असून गेले आठवडाभर ते पाकिस्तानमध्ये आहेत.
पूर्णम कुमार यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. तसेच त्यांच्या पत्नी गरोदर आहेत. कुमार यांच्या पत्नी आपला मुलगा आरव आणि इतर कुटुंबीयांसोबत चंडीगढला पोहोचल्या आहेत. सगळं काही घ्या पण माझ्या बाबांना सोडा अशी आर्त हाक आरवने पाकिस्तानला दिली आहे.
कुमार यांच्या पत्नी रजनी म्हणाल्या की गेल्या सहा दिवसांपासून कुमार यांना पाकिस्तानने नजर कैदेत ठेवलं आहे. रजनी पंजाबमध्ये जाऊन सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. गरज पडल्यास दिल्लीतही जातील. रजनी म्हणाल्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांना काळजी न करण्यास सांगितले आहे. तुमचे पती ठीक आहेत असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. पण आपला पती शत्रू राष्ट्राच्या सैनिकांच्या ताब्यात आहेत तर चिंता कशी करणार नाही असा सवाल रजनी यांनी विचारला आहे.
23 एप्रिलला जवान पूर्णम कुमार हे फिरोजपूरमध्ये हिंदुस्थान पाकिस्तान सीमेवरील धान्य घेणाऱ्या शेतकऱ्यांवर नजर ठेवत होते. तेव्हा पूर्णम कुमार चुकून पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतलं.