बायजीपुऱ्यात साला-मेहुण्याचा दगडाने ठेचून निघृण खून; चोरीची दुचाकी जप्त केल्याच्या वादातून घडले हत्याकांड

बायजीपुरा परिसरातील साला-मेहुण्याची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या दोघांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीच्या सिल्लोड येथून गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त केल्याच्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याचे समोर आले आहे.

सिल्लोड येथील डॉ. जाकेर हुसेननगरात राहणारा सराईत गुन्हेगार आसिफ हाफीज शेख याच्याकडून सुलतान ईसा शेख (रा. मोहननगर, रेल्वे स्टेशन परिसर) याने दुचाकी घेतली होती. ही दुचाकी चोरीची असल्याने पोलिसांनी जप्त केली. यावेळी पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केली असता, सुलतान शेखने ही दुचाकी आसिफ शेख याची असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे आसिफ शेखच्या पाठीमागे पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा लागला होता. यामुळे आसिफ शेख याला सुलतान शेखबद्दल राग होता.

दरम्यान, जुना बायजीपुऱ्यातील गंजेशाही मशिदीच्या पाठीमागे असलेल्या काकाच्या घरासमोर सुलतान ईसा शेख व त्याचा मेहुणा सलमान आरेफ खान हे दोघे झोपले होते. त्यावेळी सलमान ईसाच्या काकाचा मुलगा जुबेर खान याला रात्री १२.३० वाजता आसिफ शेख याचा फोन आला होता. जुबेर खान याने तो बुलढाणा येथे असल्याचे खोटे सांगितले. हाफिज याने सुलतान शेख कुठे आहे? त्याने माझी मोटारसायकल घेतली. मी सुलतानला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती, अशी माहिती जुबेर खान याने पोलिसांना दिली. दरम्यान, दुचाकी प्रकरणामुळे चिडलेला आसिफ शेख हा सलमान खान याचा शोध घेत होता. शोधाशोध करीत तो जुना बायजीपुरा येथे पोहोचला. त्याला सलमान शेख, त्याचा साला सुलतान शेख हे दोघे घराबाहेर झोपलेले आहेत, हे समजल्यावर त्याने सलमान आणि सुलतान शेख यांचा डोके आणि चेहरा ठेचून खून केला. आरेफ खान याने पोलिसांकडे अशी तक्रार दिली. या तक्रारीवरून जिन्सी पोलिसांनी आसिफ शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, बायजीपुरा भागात दुहेरी हत्याकांड प्रकरणाची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारेकरी आसिफ हाफीज शेख याचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांच्यासह संदीप तायडे, परभत म्हस्के, विलास मुठे या पथकाने सिल्लोड पोलिसांशी संपर्क करून सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब मुंडे, योगेश मोकळे, रामानंद बुधवंत, महिला पोलीस अंमलदार ममता मोरे यांच्या मदतीने मारेकरी शेख आसीफ याला सिल्लोड येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. दुहेरी हत्याकांड करणारा आसीफ शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यात खुनाचा तसेच इतर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय एक गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यातही दाखल आहे.