INDIA आघाडीतील नेते मुकेश सहानी यांच्या वडिलांची निर्घृण हत्या, आरजेडीची सरकारवर टीका

jitan sahani

बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील विकासशील इंसान पार्टीचे (VIP) प्रमुख मुकेश सहानी यांच्या वडिलांची त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी जितन सहानी यांचा छिन्नविछिन्न मृतदेह बेडवर आढळून आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी जगन्नाथ रेड्डी यांनी या घटनेला दुजोरा दिला असून पोलीस पथक सहानींच्या घरी पोहोचले आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिहार सरकारमधील माजी मंत्री, मुकेश सहानी हे विकासशील इंसान पक्षाचे नेतृत्व करतात, ज्यांचा ओबीसी समाजाचा भक्कम आधार आहे. VIP सध्या INDIA आघाडी सोबत आहे.

या धक्कादायक गुन्ह्याच्या तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक तयार करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांनी सांगितले.

जीतन सहानी यांच्या घरी झालेल्या हत्येवरून प्रमुख विरोधी पक्ष आरजेडीने नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरजेडीचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, या घटनेने राज्याला धक्का बसला आहे. ते म्हणाले, ‘बिहारमध्ये काय चालले आहे? खुनाची बातमी आल्याशिवाय एकही दिवस जात नाही. एक निर्बुद्ध सरकार सत्तेवर आहे. व्यवस्था कोलमडली आहे’. पुढे ते म्हणाले की, ‘मुकेश सहानी यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो.’