उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील दीडशेहून अधिक गावांना पुराचा फटका बसलाय. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेय. अशातच लखीमपूरच्या एका गावात हृदयद्रावक घटना घडलीय. पुरामुळे वाहतूक ठप्प झाल्याने दोन भावांना आपल्या बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन सुमारे पाच किलोमीटर चालत घरी पोहोचावे लागले. एक भाऊ थकला की दुसरा भाऊ बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जायचा. त्यांना घरी पोहोचायला दोन तास लागले. ही घटना बुधवारी घडली. घटनेचा मन हेलावून टाकणार व्हिडीओ आज समोर आला. शिवानी असे बहिणीचे नाव आहे. ती एलेनगंज महाराज नगर येथील असून ती बारावीची विद्यार्थिनी होती. पालियात राहून ती शिक्षण घेत होती. शिवानीच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लखीमपूर खेरीतील दीडशेहून अधिक गावे जलमय झाली आहेत. गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबला असला तरी वनबासा बॅरेजमधून सातत्याने पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पालिया, निघासन, फुलबेहड, धौराहरा, बिजुआ भागातील गावांतील पाणीपातळी अजूनही कमी झालेली नाही.
दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती खालावली होती. टायफॉईडच्या तक्रारीनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी तिची प्रकृती आणखी बिघडल्याने डॉक्टरांनी तिला लखीमपूर येथे नेण्यास सांगितले. लखीमपूरला नेत असताना वाटेत शिवानीचा मृत्यू झाला.
भावांना बहिणीच्या डोलीला खांदा द्यायचा होता. आज ते आपल्या बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पाच किलोमीटर चालत आपल्या गावी आले, असे शिवानीचे वडील देवेंद्र यांनी सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.