
बिछान्याला खिळून पडलेल्या, काहीच कळत तसेच समजत नसलेल्या चुलत बहिणीच्या असह्यतेचा त्याने गैरफायदा उचलला होता. घरात कोणी नसताना त्याने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले, पण त्याबाबत मुलगी काही बोलू शकणार नव्हती. त्यामुळे तो निश्चिंत होता, पण अखेर नियतीने सूड उगवला. पोलिसांनी केलेल्या डीएनए चाचणीत त्याचा गुन्हा पकडला गेला. असे निच कृत्य करणाऱ्या मुलाला प्रौढ समजून त्याच्यावर खटला चालवावा, अशी पोलिसांनी मागणी केली आहे. शुक्रवारी त्यावर न्यायालय काय निर्देश देणार त्याकडे पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य घडले होते. केवळ श्वास चालू असलेल्या अवस्थेत ती अल्पवयीन मुलगी असून ती बेडवर पडून असते. तिला ना वेदना होत ना काही कळत, समजत. याचाच तिच्या चुलत भावाने गैरफायदा उचलला. घरात कोणी नसताना त्याने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले. परिणामी त्याच्यापासून मुलगी गर्भवती राहिली. मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे कळताच तिच्या पालकांच्या पायाखालची जमिनीच सरकली. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी चौकशी, माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे पोलिसांनी अखेर घरातले आणि घरात ये-जा करणाऱ्यांची डीएनए चाचणी केली. तेव्हा पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे भासवून तो मी नव्हेच असे दाखविणारा मुलीच्या चुलत भावानेच हे कृत्य केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली, परंतु गुन्हा घडला तेव्हा म्हणजे जून 2024 मध्ये आरोपीचे वय 17 वर्षे आठ महिने असे होते. म्हणजेच 18 वर्षे पूर्ण व्हायला चार महिने बाकी होते. त्यामुळे त्याला डोंगरी बालगृहात ठेवण्यात आले. पण त्याने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याला प्रौढ समजून त्यानुसार त्याच्यावर खटला चालवावा अशी पोलिसांची मागणी आहे. न्यायालय ती मागणी मान्य करते का त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.