बहिणीचा छळ होत असल्याचे समजल्यानंतर भावोजीची समजूत काढण्यासाठी गेलेल्या मेहुण्याला प्राण गमवावा लागला होता. पाच वर्षांपूर्वी आग्रीपाडा परिसरात घडलेल्या या घटनेत मेहुण्याची हत्या करणाऱया भावोजी राजेश बोरीचा याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आणि जन्मठेपेसह पाच हजारांचा दंड ठोठावला.
27 जानेवारी 2020 रोजी ही घटना घडली होती. विनोद मोखरा असे हत्या झालेल्या मेहुण्याचे नाव आहे. विनोद व त्याचा भाऊ गिरधर भावोजीची समजूत काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या पत्नीदेखील सोबत होत्या. सर्वजण सुरुवातीला बोरीचा याच्या आर्थर रोडजवळील घरी गेले होते. बोरीचा आत्येच्या घरी गेल्याचे कळल्यानंतर सर्व तेथे पोहोचले. मात्र आत्येने सर्वांना आपल्या घराबाहेर जाऊन चर्चा करण्यास सांगितले. त्यानुसार विनोद व त्याचे कुटुंबीय घराबाहेर थांबले होते. यावेळी झालेल्या वादात बोरीचा याने विनोदच्या छाती व डोक्यावर चाकूने वार करीत हत्या केली होती. याप्रकरणी सरकारी वकील वीणा शेलार आणि पोलीस निरीक्षक (सध्या निवृत्त) अनिल कोलथरकर यांनी भक्कम पुरावे सादर केले. त्याआधारे सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी राजेश बोरीचा याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.