ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्यात. निवडणुकीला काही दिवस शिल्लक असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह लंडनमधील श्री स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मंदिरात उपस्थित लोकांशी त्यांनी हिंदू धर्माबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
काय म्हणाले ऋषी सुनक?
‘मी हिंदू आहे आणि मलाही तुमच्याप्रमाणे माझ्या श्रद्धेतून प्रेरणा आणि सांत्वन प्राप्त होते. धर्म माझा मार्गदर्शक आहे’, असे वक्तव्य सुनक यांनी यावेळी केले. संसद सदस्य म्हणून भगवदगीतेवर हात ठेवून शपथ घेताना मला अभिमान वाटतो, असेही ते यावेळी म्हणाले.
“आपला धर्म आपल्याला आपले कर्तव्य निभावण्यास शिकवतो. परिणामांची चिंता करण्यास नाही शिकवत. फक्त आपण हे ईमानदारीने निभावले पाहिजे. माझ्या आई-वडिलांनी मला हेच शिकवले आणि मी ही माझे जीवन अशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो. हीच शिकवण मला माझ्या मुलींना मोठ्या झाल्यावर द्यायची आहे. समाजसेवेसाठी मला मार्गदर्शन करणारा हा धर्म आहे”, असेही सुनक पुढे म्हणाले.