वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा पूल वर्षभरापासून बंद, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

>> चेतन वाघमारे

वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर देवळी तालुक्यात असलेले तांबा हे गाव. कोट्यावधीचा निधी खर्च करून शासनाने वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा पूल तांबा येथे बनविला. वर्धा नदीवर तयार झालेल्या या पुलाने दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा झाली. परंतु या पुलालगतचा रस्ता तसेच पुलाचा काही भाग खचल्याने एका वर्षापासून नागरिकांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने दोन जिल्ह्यांचा या परिसरातील संपर्कच तुटला असून लवकरात लवकर पुलाच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीसाठी बजेट मधून तरतूद करावी लागते, ती प्रक्रिया आहे असेच सांगण्यात येत असल्याने आता दोन्ही जिल्ह्यातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दोन वर्षापासून अतिवृष्टीचा तडाखा वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्याला बसतो आहे. वर्धा जिल्ह्यात असलेल्या वर्धा नदीवरील अप्पर वर्धा तसेच निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडले जाते व त्यामुळे तांबा येथील पुलालगतचा रस्ता व तसेच पुलाचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. आता चक्क वाहतूकच बंद झाली आहे. दोन्ही जिल्ह्यातील सरपंचांनी तसेच नागरिकांनी या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उंबरठे झिजवले. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. पुलावरून जाणे – येणे बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शेतीच्या वहिवाटीचा मार्ग सुद्धा बंद झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना कळंब व यवतमाळ जिल्ह्यातील बाजारपेठ महत्त्वाची होती, परंतु त्याकरिता मोठा फेरा घेऊन जावे लागत आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले सावंगी व सेवाग्राम येथील रुग्णालयात जाण्यासाठी अडचण होत आहे. स्थानिक आमदार याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप जिल्ह्याच्या तांबा येथील सरपंच प्रमोद कातरकर यांनी केला आहे.

खचलेल्या रस्त्यामुळे रात्रीच्या वेळेला अनेक अपघात या पुलावर झाले आहे. तसेच दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेला पूल हा पांढरा हत्ती ठरत आहे. ज्यांची शेती नदीच्या पलीकडे आहे त्यांनी शेती कशी करावी असा प्रश्न उपस्थित झाला असून शेती पडीत पडण्याच्या मार्गावर आहे. वारंवार निवेदने देऊन सुद्धा प्रशासन लक्ष देत नसल्याची ओरड नागरिक करीत आहे.

रस्ते इमारती पूल विकासाचे पहिले पाऊल यासारखे मोठे ब्रीदवाक्य वापरले जाते परंतु प्रत्यक्षात दोन वर्षापासून जर नागरिकांना पुलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उंबरटे झिजवावे लागत असेल शेती कशी करावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल अशा छोट्या छोट्या प्रश्नाचे उत्तर सरकार देऊ शकत नसेल लोकप्रतिनिधी या पुलाच्या दुरुस्ती कडे केव्हा लक्ष देतील व नागरिकांना केव्हा दिलासा मिळेल हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

पूल नादुरुस्त असल्याने शेतीची वहिवाट करण्यासाठी मोठी अडचण जात आहे तसेच शाळेकरी विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय.
– श्रीकांत वाघाडे गावकरी तांबा

ग्रामपंचायत तर्फे अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व नेते लक्ष देण्यास तयार नाही कित्येकदा फोनवरून संपर्क साधला यवतमाळ येथे ऑफिसला जाऊन सुद्धा भेटलो परंतु समस्येचे समाधान न झाल्याने आम्ही या पुलावर तीव्र आंदोलन करू.
आशिष येंडे, माजी उपसरपंच तांबा