
पुण्यातील एका महिलेने तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाच ठार मारण्याची सुपारी दिल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा साखरपुडा झाला होता आणि यानंतर प्रीवेडिंग शूटही त्यांनी केले होते. पण यानंतर तिचं मन बदललं आणि तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने नवऱ्याचा काटा काढण्याचा कट रचला. मात्र पोलिसांनी हा कट उधळून टाकला आहे. तसेच त्यांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र वधू अजूनही फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी सुनील दांगडे असे त्या महिलेचे नाव असून ती अहिल्यानगरची रहिवासी आहे. तर सागर जयसिंग कदम असे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव असून तो जळगावचा रहिवासी आहे. या दोघांचेही एकमेकांच्या संमतीने लग्न ठरले. यानंतर त्यांचा साखरपुडाही झाला. यानंतर त्यांनी प्रीवेडिंग शूटही केलं होते. मात्र काही काळ गेल्यावर मयुरीने लग्नाचा विचार बदलला आणि तिने सागरशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
मयुरीला लग्न करायचे नव्हते यासाठी तिने आपल्या एका मित्रासोबत मिळून सारगला ठार मारण्याचा कट रचला. संदीप गावडे असे तिच्या मित्राचे नाव आहे. संदिप इतर पाच मारेकऱ्यांना सागरला मारण्यासाठी 1.50 लाखांची सुपारी दिली. यानंतर माही जळगाव येथील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या सागरवर 27 फेब्रुवारी रोजी दौंड तालुक्याजवळ हल्ला करण्यात आला होता. हॉटेलजवळ त्याला काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. यामुळे सागरचा एक पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याच्या डोक्याला पाठीला गंभीर दुखापत झाली. यामुळे प्रत्यक्षदर्शीनीं त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तक्रार दाखल करून तातडीने आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, आदित्य शंकर दांगडे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सूरज दिगंबर जाधव, इंद्रभानू सखाराम कोळपे या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी चौकशीदरम्यान संशयितांनी त्यांच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे आता यवत पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे आणि गुन्ह्यात वापरलेली एक पांढऱ्या रंगाची व्हर्ना कार जप्त केली आहे.