
लग्नाच्या दिवशी मेकअप करण्यासाठी गेलेली वधू अचानक आपल्या जीवलग मैत्रिणीसोबत म्हणजेच गर्लफ्रेंडसोबत पळाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे उघडकीस आली. झाशी येथे राहत असताना वधू व तिची मैत्रीण या दोघी रिलेशनशिपमध्ये होत्या. वधूच्या कुटुंबाला या दोघींच्या नात्याची माहिती होती, पण त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. उलट मुलीचे लग्न ठरवले. अखेर ऐन लग्नाच्या दिवशी वधू तिच्या गर्लफ्रेंडसोबत पळून जाण्यात यशस्वी ठरली. नवरदेव मुझफ्फरनगरचा, तर वधूचे कुटुंब झाशीहून लग्नासाठी आले होते. लग्नाच्या दिवशी ब्युटी पार्लरमध्ये कुटुंबीयांनी दुपारी 4 वाजता वधूला सोडले. तीन तासांनंतर ते परत आले तेव्हा वधू बेपत्ता होती. ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, ती आधीच निघून गेली आहे. फोनवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नाही. अखेर सीसीटीव्ही तपासले असता ती गर्लफ्रेंडसोबत पळून जात असल्याचे दिसले.
मृत्यू झाल्याची अफवा
मुलगी पळून गेल्याची गोष्ट लपवण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला हृदयविकाराचा झटका आला असून तिला गंभीर अवस्थेत मेरठला नेताना तिचा वाटेतच मृत्यू झाला आहे, असे सांगितले. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. मात्र कुटुंबीयांनी जास्त काही माहिती देण्याचे टाळल्याने या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय वराच्या कुटुंबीयांना आला. वधूच्या कथित मृत्यूबद्दल कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी कसून चौकशी करताच मुलगी पळून गेल्याचे सत्य समोर आले.