एमएमआरडीए घोटाळ्यासंदर्भात सरकारची सारवासारव, लाच मागितल्याचे पत्रात नमूद नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

एमएमआरडीतील घोटाळ्यासंदर्भात महायुती सरकारने आज सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सच्या सिस्त्रा कंपनीने एमएमआरडीएला पाठवलेल्या पत्रामध्ये कुठेही लाच मागितल्याचा उल्लेख नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

सह्यादी अतिथीगृहावर विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमएमआरडीए प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांना दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यास सांगण्यात आले आहे. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच गुप्ता हे पुढील निर्णय घेतील.  इतके दिवस हे प्रकरण होत असल्याचा कंपनीचा दावा आहे तर आधीच पत्र का दिले नाही असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

…तर राजीनामा मागू – फडणवीस

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. नैतिकतेचं अधःपतन झालं आहे असं वाटल्यास आम्ही थेट राजीनामा मागू. कोणालाही वाचवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. माणिकराव कोकाटे यांच्याबाबतीत न्यायालयाचा निर्णय आम्हाला बंधनकारक असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘सामना’च्या ‘रोखठोक’ची चर्चा

यावेळी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदराचीही चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या गुप्त भेटीतील संवाद त्यात देण्यात आला आहे. शिंदे यांनी ती भेट पहाटे झालीच नव्हती, असे सांगण्याचा प्रयत्न केला तर अजित पवार यांनी आपणही त्यावेळी शिंदे यांच्यासोबत होतो, असे म्हटले. इतक्या उकाड्यात कोल्ड वॉर कसे होणार. आमच्यात सगळं काही ’ठंडा ठंडा कुल कुल’ आहे, असे फडणवीस म्हणाले.

मीडियाने नाकीनऊ आणलेत

मिंधे सरकारच्या काळातील घोटाळ्यांबाबत महायुती सरकारने कडक भूमिका घेतली आहे. अनेक घोटाळ्यांची चौकशी लावली आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही आणि डिजिटल मीडियामध्ये त्याच्या बातम्या येत आहेत. वारंवार घोटाळे बाहेर येऊ लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैराण झाले आहेत. मीडियाला खुलासे देऊन नाकीनऊ आले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.