
पाव बनवण्यासाठी वापरले जाणारे यीस्ट फ्रिजमध्ये ठेवणे हा प्रक्रियेचा भाग नाही. यासाठी कर्मचारी राज्य विमा कायदा (ईएसआय) लागू होणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्या. अरुण पेडणेकर यांच्या एकल पीठाने ईएसआयचे विभागीय आयुक्त यांच्यामार्फत दाखल झालेली याचिका फेटाळून लावली. विभागीय आयुक्तांमार्फत 1999 मध्ये ही याचिका दाखल झाली होती. तब्बल 15 वर्षांनी हा मुद्दा निकाली निघाला आहे.
काय आहे प्रकरण
उमरखाडी येथील पहेलवी बेकरीमुळे हा मुद्दा न्यायालयात पोहोचला. या बेकरीत 20 कामगार होते. या बेकरीला ईएसआय निरीक्षकाने भेट दिली. बेकरीत पावासाठी लागणारे इस्ट फ्रिजमध्ये ठेवले होते. पाव बनवण्यासाठी विजेचा वापर केला जात होता. बेकरी ईएसआय कायद्याच्या चौकटीत येते. मालकाने कर्मचाऱयांचा ईएसआयचा हप्ता जमा करावा, असे आदेश देण्यात आले. त्याची कारणे द्या नोटीस बेकरीला देण्यात आली. 4 ऑक्टोबर 1976 ते 11 नोव्हेंबर 1978 या काळातील 16 हजार 382 रुपयांचा हप्ता जमा व त्यावरील 889 रुपये व्याज द्यावे, असे बेकरीला सांगण्यात आले. त्याविरोधात ईएसआय कोर्टात बेकरीने अपील दाखल केले. हे अपील मंजूर झाले. त्याला ईएसआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले.
बेकरीचा युक्तिवाद
यीस्ट कच्चा माल म्हणून फ्रिजमध्ये ठेवला जातो. पाव बनवण्यासाठी विजेचा वापर केला जात नाही. यीस्ट दररोज बाजारातून आणले जाते. ईएसआय कोर्टाचा निकाल योग्य आहे. बेकरीला ईएसआयचा नियम लागू होत नाही, असा युक्तिवाद बेकरीकडून करण्यात आला.
ईएसआय कोर्टाचा निर्णय
घरगुती फ्रिजमुळे पाव बनवण्याच्या प्रकियेत विजेचा वापर झाला, असा समज केला जाऊ शकत नाही. ही प्रक्रिया ईएसआय कायद्याच्या चौकटीत येत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
ईएसआयचा दावा
पाव बनवण्यासाठी यीस्टचा वापर केला जातो. मैदय़ामध्ये ते मिक्स केले जाते. यीस्ट फ्रिजमध्ये ठेवले जाते. म्हणजेच पाव बनवण्यासाठी विजेचा वापर केला जातो. ईसआयचा नियम बेकरीला लागू होतो, असा दावा ईएसआय विभागीय संचालकांकडून करण्यात आला.